साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या अनुवाद साहित्यावर मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा
मुंबई : ( लोकसागर न्यूज ) मुंबई विद्यापीठाच्या साहित्यिक उपक्रमांतर्गत साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे अध्यसन केंद्र आणि अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI) यांच्या संयुक्त विद्यमाने “Translating Anna Bhau Sathe: Linguistic, Cultural, and Practical Challenges” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा दि. २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील नॅनो टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, दुसरा मजला, नॅनो टेक्नॉलॉजी इमारत, कालिना, सांताक्रूझ, मुंबई येथे संपन्न होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.बळीराम गायकवाड यांनी सांगितले.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या अनुवाद प्रक्रियेत येणारी भाषिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक आव्हाने यांचा या कार्यशाळेत सखोल ऊहापोह करण्यात येणार आहे. विविध भाषा, संस्कृती आणि समाजविश्वाला जोडणाऱ्या अनुवाद प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबींवर तज्ज्ञ, अभ्यासक व संशोधक यांच्यात शास्त्रीय संवाद साधला जाणार आहे.
कार्यशाळेमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा व्यापक प्रसार, त्यांच्या साहित्यिक वारशाचे जतन व संवर्धन तसेच विविध भाषांमध्ये अनुवाद करताना आवश्यक असलेल्या सांस्कृतिक संवेदनशीलतेवर विशेष भर दिला जाणार आहे. साहित्यप्रेमी, संशोधक, अभ्यासक आणि अनुवाद क्षेत्रातील व्यक्तींना या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed