गव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रंधवे दांपत्याचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत भावनांचा अविस्मरणीय संगम

गव्हाण (ता. पनवेल) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज, गव्हाण येथील इंग्रजी विषयाचे उपशिक्षक सागर शंकर रंधवे यांच्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक सेवेला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती सन्मान सोहळा रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते तथा माजी खासदार श्री. रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत दिमाखदार, उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यास संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रविंद्र भोईर, रायगड जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळी, रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव व्ही. व्ही. पाटील, जनरल बॉडी सदस्य डी. बी. पाटील, शिक्षक व कामगार नेते संजय भगत, शिक्षक नेते भास्कर देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजयशेठ घरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व ॲड. राहुल घरत, प्रा. भाऊसाहेब खोसे, संजय शिरडीकर, अरुणकुमार बाबरे, चंद्रकांत वाकचौरे, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक बाळासाहेब गोरे, रयत बँकेचे संचालक तथा वाशी शाखेचे चेअरमन किशोर पाटील यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, रायगड व अहिल्यानगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य, शिक्षक, सेवक, गव्हाण व पिरकोन शाखेचे माजी विद्यार्थी, विद्यमान विद्यार्थी, पंचक्रोशीतील नागरिक तसेच रंधवे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसर एका कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे स्वरूप धारण करून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे यांनी प्रास्ताविकातून रंधवे सरांच्या २८ वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या अध्यापनातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांशी असलेले आत्मीय नाते आणि सामाजिक बांधिलकी यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन दर्शना माळी आणि हर्षला पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रविंद्र भोईर यांनी केले.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी स्मित कुंदन मोकल व आरोही बापू नाळे यांनी आपल्या मनोगतातून रंधवे सरांविषयीची कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय, प्रेमळ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या भावनिक मनोगताने सभागृह भारावून गेले.
समारंभात बाबासाहेब भोस, संजय भगत, भास्कर देशमुख, संजय शिरडीकर, प्रा. भाऊसाहेब खोसे, देवेंद्र म्हात्रे, बाळासाहेब गोरे, व्ही. व्ही. पाटील, डी. बी. पाटील, प्राचार्या ज्योत्स्ना ठाकूर, प्रा. संतोष रंधवे, राजकुमार चौरे आदी मान्यवरांनी आपल्या भाषणातून सागर रंधवे यांच्या शिक्षक, साहित्यिक, प्रभावी वक्ते, पत्रकार, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निस्सीम समर्पणाचा गौरव करत त्यांच्या कार्याला उज्ज्वल सलाम केला.
अध्यक्षीय समारोपात लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांनी रंधवे सरांच्या २८ वर्षांच्या निष्ठावान सेवेला गौरवाची पावती देत, “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून सागर रंधवे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या मूल्यांना न्याय देत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीतील शिक्षकांनी घ्यावा,” असे गौरवोद्गार काढले.
यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या वतीने सागर रंधवे व त्यांच्या सौभाग्यवती सौ. वैशाली सागर रंधवे यांचा पुष्पगुच्छ, शाल, स्नेहवस्त्र आणि मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात झालेल्या या सन्मानाने सभागृह दुमदुमून गेले.
सत्काराला उत्तर देताना सागर रंधवे सर अत्यंत भावुक झाले. आपल्या २८ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रयत शिक्षण संस्था, पालक, मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या भावनिक मनोगताने सभागृहातील वातावरण क्षणभर स्तब्ध झाले. अनेक विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, मान्यवरांचे तसेच उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले आणि हा सेवापूर्ती सन्मान सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा अविस्मरणीय भावनिक क्षणांचा साक्षीदार ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed