‘नशीले पदार्थ विक्री म्हणजे देशद्रोह’; नशामुक्त रायगडसाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा
प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे आवाहन;

सेवा संकल्प अभियान व शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश


पनवेल : रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘नशामुक्त रायगड’ या उपक्रमांच्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.


यावेळी अध्यक्षीय भाषणातून आ. रवींद्र चव्हाण यांनी अमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर तीव्र शब्दांत हल्ला चढविताना “नशेची विक्री म्हणजे देशद्रोह आहे,” असे प्रतिपादन केले. नशिले पदार्थ विकणारे समाजातील पुढील अनेक पिढ्यांना मृत्यूच्या खाईत लोटत असल्याचे सांगत अशा प्रवृत्तींविरोधात व्यापक जनजागृती आणि कठोर सामाजिक लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.


सेवा संकल्प सप्ताह, नशामुक्त रायगड जिल्हा तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. डिजिटल प्लॅटफॉर्मचा विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने वापर करून दिशाभूल करणारी माहिती पसरविली जात असल्याचे नमूद करताना कार्यकर्त्यांनी डिजिटल माध्यमांमध्येही सक्रिय आणि सक्षम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रायगड हे महाराष्ट्राचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे त्यांनी यावेळी पुन्हा अधोरेखित केले.
सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती देताना या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असे आवाहनही आ. चव्हाण यांनी केले.


‘नशामुक्त रायगड’ अभियानाच्या टी-शर्टचे अनावरण
या वेळी रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने ‘नशामुक्त रायगड जिल्हा’ अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमोशनल टी-शर्टचे अनावरण आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आ. रवींद्र चव्हाण यांनी संपादित केलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


विकसित भारत सेवा संकल्प अभिनंदनाचा ठराव


बैठकीत प्रकाश बिनेदार यांनी सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत ‘विकसित भारत संकल्प अभिनंदन’ ठराव मांडला. महापौर नितीन पाटील यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले.

राजकीय प्रस्ताव:


आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध विकासकामे व प्रकल्पांच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीबद्दल अभिनंदनाचा राजकीय प्रस्ताव मांडला.
या प्रस्तावाच्या समर्थनार्थ बोलताना आ. प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्वसन प्रक्रियेचा दाखला देत तीन हजारांहून अधिक स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळ प्रकल्पात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. संघटनात्मक विविध उपक्रम तसेच एस.आय.आर.सह विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात रायगड जिल्हा आघाडीवर असल्याचेही त्यांनी नमूद केले.


आमदार महेश बालदी यांनी या राजकीय प्रस्तावास अनुमोदन देताना विरोधकांकडून ‘फेक नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. विविध उदाहरणे देत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला आणि शहरी नक्षलवादाचे निर्दालन करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.


यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांची भाषणे झाली. उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविक केले.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासह आ. योगेश सागर, आ. निरंजन डावखरे, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ज्येष्ठ उद्योजक जे. एम. म्हात्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, युवा नेते परेश ठाकूर, बाळासाहेब पाटील, प्रितम म्हात्रे, अरुणशेठ भगत, पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, महापौर नितीन पाटील, ममता म्हात्रे, रवी भोईर, बबन मुकादम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका नगरसेवक, विविध सेलचे संयोजक, अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी विविध पदांवर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ आणि महाराष्ट्र राज्यगीताने, तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed