शिर्डी सेमी फायनल तर मुंबई फायनल – राजेंद्र त्रिभुवन
लोकसागर न्यूज –
शिर्डी (अहिल्यानगर) – अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आणि लाभ वंचित घटकांना न्याय मिळावा या मागणीसाठी सकल मातंग समाज, अहिल्यानगर जिल्हा (शिर्डी) च्या वतीने शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता शिर्डी येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.सुप्रीम कोर्टाने दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येईल असा ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने तात्काळ अंमलबजावणी करून राज्यात उपवर्गीकरण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाच्या प्रमुख मागण्या :
१. मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने तात्काळ अंमलबजावणी करून महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे.
२. महाराष्ट्र राज्यात उपवर्गीकरण लागू होत नाही तोपर्यंत कुठलीही मेगाभरती शासनाने करू नये.
३. सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर तात्काळ शासनाने गुन्हे दाखल करावेत.
“खूप लढलो इतरांसाठी आता फक्त लढू जातीसाठी” या घोषणेखाली हा महामोर्चा होणार आहे.
महामोर्चाचा मार्ग :
महामोर्चाची सुरुवात लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे नगर, शिर्डी येथून होईल. तेथून छत्रपती शिवाजीमहाराज व्यापारी संकुल मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी येथे मोर्चाचा समारोप होईल.
या मोर्चात शिर्डी शहरासह राहाता तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सकल मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक – सकल मातंग समाज अहिल्यानगर जिल्हा समन्वयक राजेंद्र त्रिभुवन यांनी दिली.
सकल मातंग समाज जिल्हा समन्वयक राजेंद्र त्रिभुवन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे असे म्हटले आहे की,अ ब क ड उपवर्गीकरण आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात असून शिर्डी येथे दिनांक १८ ला होणारा महामोर्चा सेमी फायनल तर मुंबई मध्ये २९ सप्टेंबर रोजी होणारा महामोर्चा फायनल होणार असून समाजबांधवांना मोठ्या सहभागाचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही आंदोलनांना समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी होणे ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दोन्ही मोर्चे यशस्वी करणे हे कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा एका संघटनेचे काम नाही. हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आणि प्रत्येक संघटनेचे सामूहिक कर्तव्य आहे. या लढ्यात कोणाला काही स्वार्थ साधायचा असेल तर साधू द्या, पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि पुढील पिढीसाठी त्याग करायचा आहे, या भावनेने प्रत्येकाने कोणाची वाट न बघता सहभागी व्हावे.
शिर्डी मोर्चाला राज्यभरातून प्रतिसाद
शिर्डीच्या मोर्चाबाबत बोलताना त्रिभुवन म्हणाले की, या मोर्चासाठी केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तरेकडील समाजबांधवच नाही तर दक्षिणेकडील बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जवळपासच्या जिल्ह्यांमधूनही समाजबांधव मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होणार आहेत. त्यांनी सांगितले की, आता श्रेयवाद किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. शेवटी आपल्या सर्वांसाठी समाजच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढा – आपण ज्या उद्देशासाठी आंदोलन करत आहोत, त्या नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेत सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. काही आता आहेत, काही पुढे येतील आणि काही त्यानंतर येतील. त्यांच्यासाठीच आपण हे मोर्चे आणि आंदोलन करत आहोत आणि यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रत्येक समाजबांधवाने जबाबदारीने आपापल्या भागातील वाडी, गल्ली, प्रभाग, वार्ड आणि गावात मोर्चाविषयी जनजागृती करावी. शिर्डीचा मोर्चा लाखोंच्या संख्येने कसा यशस्वी होईल यासाठी पूर्ण ताकतीने आणि एकाग्रतेने काम करावे, असे आवाहनही करण्यात आले.
