अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या अनुवादावरील राष्ट्रीय कार्यशाळेत सखोल विचारमंथन

मुंबई, दि. २४ : मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरी परिसरात आयोजित “अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अनुवाद : भाषिक, सांस्कृतिक आणि व्यवहारिक आव्हाने” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत अण्णा भाऊ साठे यांच्या समृद्ध व सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण साहित्याच्या विविध भाषांमधील अनुवादासंदर्भात सखोल व अर्थपूर्ण विचारमंथन करण्यात आले.


राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी होते. यावेळी आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील वारे (IRAS), हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचे प्रा. भीमराव भोसले, सुप्रसिद्ध अनुवादक व लेखक श्री. रवींद्र गुर्जर, अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव श्री. शिवा कांबळे, सदस्य प्रा. डॉ. संजय गायकवाड, श्री. आनंद शिंदे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन आरेकर यांनी केले.


कार्यशाळेत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या विविध साहित्यकृतींचे इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्या लेखकांनी आपले अनुभव व मनोगते व्यक्त केली. तसेच संपादक मंडळातील सदस्यांनीही अनुवाद प्रक्रियेतील अनुभव कथन केले. याप्रसंगी प्रकाशन संस्था आणि अनुवादक लेखक यांच्यामध्ये विविध साहित्यकृतींच्या अनुवादासंदर्भातील करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
अनुवादक डॉ. दीपक ननावरे, डॉ. अश्विन रांजणकर, डॉ. विजय रोडे, प्रा. रतिलाल रोहित, आकाशवाणी मुंबईच्या संचालिका डॉ. वैशाली त्रिवेदी तसेच अनुवादकांच्या अनुभवकथन परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. सतीश देशपांडे यांनी विविध साहित्यकृतींचा अनुवाद करतानाचे आपले अनुभव मांडले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अनुवादक प्रा. सचिन हुंबे यांनी केले.


दुपारच्या सत्रात संपादक मंडळाच्या सदस्यांनी अनुवादित साहित्याबाबत आपली मते व सूचना मांडल्या. यामध्ये डॉ. अभय इनामदार, प्रा. सायली धोंगडे, प्रा. प्रसाद दत्त गाडगीळ, श्रीमती सुचिता फडके आणि संपादक मंडळ परिसंवादाचे अध्यक्ष श्री. रवींद्र गुर्जर यांनी अनुवादकांनी केलेल्या अनुवादाचे विविध पैलू उलगडून सांगत मौल्यवान सूचना केल्या.


दरम्यान, कार्यशाळेच्या समारोप समारंभात शिक्षक म्हणून यशस्वी सेवापूर्तीबद्दल साहित्यिक सागर रंधवे यांचा मुंबई विद्यापीठ साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र व आर्टीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील वारे (IRAS) यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आर्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, मंत्रालयातील अधिकारी श्री. रमेश साळवे, पनवेल नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी श्री. सुदाम धुपे, प्रा. डॉ.शिवाजीराव वाघमारे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.


या राष्ट्रीय कार्यशाळेने अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करताना उद्भवणारी भाषिक, सांस्कृतिक आणि व्यवहारिक आव्हाने यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. साहित्यिक अनुवादाच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांचे विचार आणि साहित्य अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed