सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये १३९ वी कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
उलवे नोड, नवी मुंबई ( लोकसागर वृत्त ) – महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत अर्थात बहुजनांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणारे थोर शिक्षण महर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे १३९वी जयंती येथील संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात ( इंग्रजी व मराठी माध्यम ) उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे चेअरमन नगरसेवक परेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगरे, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, महेंद्र घरत, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रवींद्र भोयर, रायगड विभागाचे पीआरओ बाळासाहेब कारंडे,गव्हाण जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर व धीरज ओवळेकर, कामोठे चे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, एल.आर.टी.ई.एम.एस. व ज्युनिअर कॉलेज कामोठेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे तर प्रमुख वक्ते म्हणून सागर रंधवे उपस्थित होते.
कर्मवीर जयंती सोहळ्याचे अध्यक्ष व संस्थेचे थोर देणगीदार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णा आणि वहिनींच्या त्यागाचे सतत स्मरण ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रमुख वक्ते सागर रंधवे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याला उजाळा देणारे भाषण सादर केले. आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले कार्य, त्यांचे शैक्षणिक विचार, समाजसेवा तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी दिलेले योगदान याविषयी माहिती दिली.
यावेळी मराठी माध्यमातील इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कर्मवीर जयंतीनिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
प्रमुख वक्ते सागर रंधवे तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिक परिश्रम यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. कर्मवीरांच्या शिक्षण कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे १३९ वी कर्मवीर जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.



