लोकसागर न्यूज-
कळंबोली, दि. २९ ऑगस्ट : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा येथील सुधागड विद्या संकुलाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि सन्माननीय वातावरणात पार पडला.कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक भगव्या फेट्यांनी सजलेल्या शिक्षकांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष शोभा आली होती.या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षक नेते संजय भगत, रायगड जिल्हा परिषद कृषी व दुग्धविकास समितीचे सभापती वैकुंठ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक बबन मुकादम, ॲड. प्रतिभा भोईर यांच्यासह अनेक नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.यावेळी गुणवंत शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी हिताच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शिक्षकांचे कार्य हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी पिढी घडवण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करत असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.”गुणवंत शिक्षकांचा सन्मान म्हणजे शिक्षण क्षेत्राचा गौरव आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असून यामुळे शिक्षकांना अधिक प्रेरणा व ऊर्जा मिळेल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.८७ गुणवंतांचा सन्मानया पुरस्कार सोहळ्यात एकूण ८७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रवींद्र भोईर, शिक्षक नेते सागरकुमार रंधवे, सदानंद म्हात्रे, उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अविनाश घरत, प्रमोद म्हात्रे आणि शरयू गावंड यांच्यासह अनेक रयत सेवक व अन्य संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्थाचालक व पदाधिकारी आदींचा समावेश होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी आणि वाकडीकर सर यांनी केले, तर डाकी सर यांनी आभार मानले. पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

