लोकसागर न्यूज
शिर्डी : मुख्याध्यापक तसेच एक आदर्श शिक्षक म्हणून मुख्याध्यापक मेहबूब शेख यांनी केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध पद्धतीने आणि मेहनतीने विद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी उल्लेखनीय योगदान दिले, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील यांनी काढले.
रयत शिक्षण संस्थेच्या निर्मळ पिंपरी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मेहबूब शेख यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मनिषा पिलगर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने सन्मानमूर्ती मुख्याध्यापक मेहबूब शेख यांचा सपत्नीक पुष्पहार, स्नेहवस्त्र, भेटवस्तू, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी कु.गौरी सुनील निर्मळ हिने आपल्या मनोगतातून शेख सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या भावनिक मनोगताने उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी मेहबूब शेख यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. त्यांनी विद्यालयाने गुणवत्ता, संस्कार आणि शैक्षणिक प्रगतीचा वारसा भविष्यातही असाच जोपासावा, असे उद्बोधक मार्गदर्शन केले.
आपल्या मनोगतात रेशमा मेहबूब शेख यांनी पतीच्या कार्यप्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर सत्काराला उत्तर देताना मेहबूब शेख यांनी आपल्या आजवरच्या जीवनप्रवासाला उजाळा देत रयत शिक्षण संस्था, विद्यालय, सहकारी, पालक, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थितांचे प्रेम आणि सहकार्य हेच आपल्या जीवनातील सर्वांत मोठे संचित असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
अध्यक्षीय भाषणात रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील यांनी मेहबूब शेख यांच्या शिस्तबद्ध कामकाजाच्या हातोटीचे विशेष कौतुक केले. अल्पावधीत त्यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून विद्यालयाच्या प्रगतीत त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शेख सरांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य बाबासाहेब दादा निर्मळ, शाळा व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय निवृत्ती निर्मळ, दत्तात्रय रामराव निर्मळ, डी. एस. निर्मळ, रामराव निर्मळ, दशरथ निर्मळ, विठ्ठलराव घोरपडे, शाळा समिती सदस्य सूर्यकांत निर्मळ यांच्यासह सत्कारमूर्ती शेख सरांचा परिवार, आप्तेष्ट, मित्रपरिवार, आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पत्रकारबंधू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मेहबूब शेख व रेशमा शेख या दांपत्याला स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ प्रदान करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सेवापूर्तीनिमित्त मेहबूब शेख यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांसह सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

