बोरावके महाविद्यालयात आठवणींचा उजाळा; माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगला जुन्या मैत्रीचा सोहळा!
महाविद्यालयाने घडविलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव; सुजीत जगधने यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
श्रीरामपूर | लोकसागर वृत्तसेवा
विद्यार्थिदशेतील आठवणी, महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षण, मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी आणि जुन्या ऋणानुबंधांना पुन्हा उजाळा देणारा आनंदसोहळा श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयात (स्वायत्त) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात अनेक माजी विद्यार्थी एकत्र आले आणि जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले.
या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुजीत जगधने होते. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात सुजीत जगधने यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वैचारिक जीवन निष्ठेवर चालणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक विचारांशी निष्ठा राखून, संस्थेची मूल्ये आणि संस्कार जपत महाविद्यालयातून घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. बोरावके महाविद्यालयाने केवळ पदवीधर विद्यार्थीच नव्हे, तर समाजाला अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे दिली आहेत. ही महाविद्यालयासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रवीण बडधे यांनी केले. माजी विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून तब्बल १२ हजार माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा स्नेहमेळाव्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कवी सागरकुमार रंधवे यांनी महाविद्यालयास पाच हजार रुपयांची देणगी दिली. तर माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब पवार यांनी अकरा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेशी असलेले नाते जपण्याबरोबरच संस्थेच्या विकासासाठी योगदान देण्याची भावना या कृतीतून व्यक्त झाली.
या स्नेहमेळाव्यास किशोर उंडे, अजय चौधरी, प्रा. विलास त्रिभुवन, गायत्री आढागळे, डॉ. संजय गायकवाड, नानासाहेब रेवाळे, हर्षल धुगे, डॉ. संगीता फासाटे, विष्णू राऊत, प्रा. बाबासाहेब कांगणे, रविंद्र तनपुरे, डॉ. प्रतिज्ञा पत्की, नानासाहेब बडाख, आर. के. सुरडकर, प्रा. किशोर कांबळे, कैलास पवार, शिवम कांडेकर, नीलम होरा, कवी-लेखक सागरकुमार रंधवे, सुहास नाईक, सागर धनेधर, किरण बाचकर, नगरसेवक राजेंद्र पवार, डॉ. नानासाहेब पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष लांडगे, अर्चना पानसरे, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. मदन सोमाणी, प्रा. जलाल पटेल, प्रा. अण्णासाहेब गोराणे, डॉ. आशिष सोमाणी, कॅलिफोर्निया येथील विशाल करीर, उपप्राचार्य प्रा. डॉ. अनुप दळवी, उपप्राचार्य प्रा. डॉ. शरद शेळके, सिने निर्माता-दिग्दर्शक विशाल शिंदे, शायर चंदर एस. वाकचौरे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. योगिता रंधाववे आणि प्रा. कल्पना थोरात यांनी केले, तर डॉ. बाळासाहेब शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाविद्यालयीन जीवनातील मैत्री, संस्कार आणि आठवणींचा ठेवा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी या स्नेहमेळाव्याने माजी विद्यार्थ्यांना मिळवून दिली. शिक्षणसंस्था आणि तिचे माजी विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा हा स्नेहसोहळा उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या.