रयत सेवक कॉपरेटिव्ह बँकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वाशी शाखेत रायगड विभागाच्या वतीने विविध मान्यवरांचा गौरव; रयत सेवकांच्या आर्थिक स्थैर्यात बँकेचे महत्त्व अधोरेखित

नवी मुंबई (वाशी) : रयत सेवकांची अर्थवाहिनी ठरलेल्या दि रयत सेवक कॉपरेटिव्ह बँकेचा वर्धापन दिन रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी वाशी शाखेत रायगड विभागाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेची वाटचाल, रयत सेवकांच्या आर्थिक स्थैर्यातील योगदान तसेच सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आर्थिक सुविधांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

वाशी, नवी मुंबई येथील बँकेच्या शाखेत आयोजित या वर्धापन दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहनराव कोंगेरे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रवींद्र भोईर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक, माजी संचालक तथा लाइफ मेंबर लालासाहेब खलाटे, प्रमोद कोळी, माजी संचालक नूरा शेख, सभासद प्रतिनिधी नितीन ठाकूर, विलास गांगड, शाखा व्यवस्थापक प्रदीप माने यांच्यासह माजी मुख्याध्यापक मधुकर हरणे, अरुण घाग, माजी उपाध्यापक सागर रंधवे, उलवे येथील सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अविनाश घरत,ज्युनिअर कॉलेज शिक्षक भिकाजी गाढे, बाबुराव पाटोळे, राजू खेडकर तसेच रोशन पाटील, गोविंद म्हात्रे,शाखा कर्मचारी राजू पठाण, प्रेरणा म्हात्रे, किरण नलावडे, सागर खरात यांच्यासह बँकेचे सभासद, रयत सेवक, सेवकांचे पाल्य व विद्यार्थी उपस्थित होते.

बँकेचे विद्यमान संचालक तथा वाशी शाखेचे चेअरमन किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात विभागीय अधिकारी मोहनराव कोंगेरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या रयत सेवक कॉपरेटिव्ह बँकेचे महत्त्व विशद केले. रयत सेवकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप यांनी रयत सेवकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात बँकेचे योगदान अधोरेखित केले. सभासदांच्या आर्थिक हितासाठी बँकेने केलेली वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बँकेचे माजी संचालक तथा रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर लालासाहेब खलाटे, प्रमोद कोळी तसेच माजी संचालक नूरा शेख यांनी समयोचित मनोगत व्यक्त करून रयत सेवकांच्या जीवनातील रयत बँकेचे महत्त्व अधोरेखित केले.

ISO मानांकनाबद्दल विलासराव जगताप यांचा सत्कार

दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या ज्यूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास ISO मानांकन प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप यांचा वाशी शाखेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

रयत को-ऑपरेटिव्ह बँक केवळ सभासदांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे कार्य करत नाही, तर गुणवत्तापूर्ण कार्याचीही कदर करते, हे या सत्कारातून अधोरेखित झाले.

उपाध्यापक सागर रंधवे यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान

तसेच नुकतेच संस्थेच्या सेवेतून निवृत्त झालेले गव्हाण शाखेतील माजी उपाध्यापक सागर शंकर रंधवे यांचाही दीर्घकाळ केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल वाशी शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन शुभेच्छांसह सन्मान करण्यात आला.

विशेष सत्कार…

उलवे येथील सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापकपदी अविनाश घरत यांची नुकतीच बदलीने नियुक्ती झाली असून त्यांचाही या निमित्त शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभासद प्रतिनिधी नितीन ठाकूर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी बँकेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाची संक्षिप्त माहिती विशद केली.

सागरकुमार रंधवे यांनी वर्धापन दिन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले, तर शाखा व्यवस्थापक प्रदीप माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याची सांगता अल्पोपहार वाटपाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed